लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

Foto

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'; ढोल-ताशांचा गजर, डीजेमुक्तीवर जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवाची सांगता शनिवारी भावपूर्ण वातावरणात झाली. 'बाप्पा निघाले गावाला' म्हणत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला वाजत-गाजत निरोप दिला. शिवाजीनगर,
जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटरसह शहरातील विविध भागांत विसर्जन मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांचा गजरात, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक दिवस घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विराजमान असलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. विविध गणेश मंडळांच्या वतीने आकर्षक
सजावट व ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते, महिला, युवक आणि बालगोपाळ यामुळे मिरवणुकांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
मानाचा गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक
मानाचा गणपती बाप्पा श्री संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी, रथ, शहणाईच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. सकाळी अभिषेक करून आरती करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पालकमंत्री संजय शिरसाठ, मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, अनिल मकरिये, आ. संजय केनेकर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संतोष चीचाणी, प्रफुल्ल मालाणी, नंदू घोडेले, अनिल चव्हाण, जुगल वर्मा, सुनील अजमेरा, मनोज पराती, रमेश घोडेले यांच्यासह आदींनी सहकार्य केले.
भाजपा गारखेडा मंडळातर्फे गणेश विसर्जन
मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी गारखेडा मंडळतर्फे शिवाजीनगर गणेश विसर्जन विहिरीजवळ सर्व गणेश मंडळांचे व गणेश भक्तांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्वगतासाठी व्यासपीठावर नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य, नगरसेविका दया गायकवाड, नगरसेविका सुरेखा गायकवाड, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ताराचंद गायकवाड, देविदास पवार, विनोद सोनवणे, बाप्पूसाहेब देसले, दिलीप झगरे, प्रतीक जाधव, गणेश निकम, विनोद पवार, रावसाहेब राऊत, अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
टीव्ही सेंटर येथे वाजत गाजत मिरवणुका
घरोघरी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडत गणेश विसर्जन केले. यावेळी टीव्ही सेंटर येथील गणेश मंडळाच्या वतीने वाजत गाजत पाऊल्या खेळत ढोल, पथकांच्या गजरात मिरवणुका काढल्या. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला... अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाला.
शिवाजीनगरः ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूका
शिवाजीनगर परिसरात गणेश मंडळांच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या, गणेशमूर्ती सजविलेल्या वाहनांमधून विसर्जनस्थळी नेण्यात आल्या. यावेळी ढोल-ताशा पथकांनी विविध ताल सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी गुलालाची उधळण करत आणि जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. यावेळी खिचडी, चणे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली,
नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघाने जपली परंपरा
* नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ भव्य विसर्जन मिरवणूक श्रीची आरती आरती करून निघाली. गजानन महाराज मंदिर ते शिवाजीनगर मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये व तसेच बिरलांड किड्स स्कूल मुला मुलीचे उत्कृष्ट लेझीम पथक सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांचे म्हण जिंकून चांगल्या प्रकारचे पथक साजरी केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उद्योगपती श्रीकांत शेळके, मनपा सभापती अनिल मकरीये, किशोर शितोळे, महापौर नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, राजु वैद्य, अशोक दामले, शंकर म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे पाटील, उपाध्यक्ष अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष प्रनिकेत दुधगावकर, स्वागत अध्यक्ष रामेश्वर मानकापे, सचिव हाफिज शेख यांच्यासह रमेश दिसागज, प्राचार्य आनंद वाघ, साहेबराव मस्के, प्रमोद ठेंगडे, सुखराज हिवराळे, डी. डी गव्हाड पाटील आर्दीची उपस्थिती होती. यावेळी पारंपरिक पद्धतीने वाजत मिरवणूक काढली. फुलांची उधळण करत डिजेमुक्त मिरवणूक काढून पारंपरिकतेचा संदेश दिला.
जिल्हा परिषद मैदान
जिल्हा परिषद मैदान परिसरातही गणेश विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली. गणेश मंडळांच्या कार्यकत्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढून गणरायाच्या मूर्ती विसर्जनस्थळी नेल्या. टीव्ही सेंटर परिसरातही गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये उत्साह असला तरी बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत भावुकता दिसून आली. गणेश विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गेल्या काही दिवसांपासून गणरायाच्या सेवेत असलेल्या भक्तांनी विसर्जनाच्या वेळी मनोभावे आरती करून बाप्पाला निरोप दिला. अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील गणेशमूर्तीचेही विधिवत विसर्जन केले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावे, यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक नियोजन केले. नागरिकांनीही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्ती संकलन केंद्रांवर गणेशमूर्ती जमा केल्या. गणेश विसर्जनाच्या दिवशी सामाजिक संघटनांच्या कार्यकत्यांनीही निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला. नागरिकांकडून फुले, हार, दुर्वा तसेच अन्य पूजासाहित्य वेगळे संकलित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकण्याऐवजी ते संकलन केंद्रांवर देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी केले.